Ad will apear here
Next
रोझेस इन डिसेंबर...


आठवण ही फार लबाड गोष्ट आहे हे माझं शाळेत असताना ठाम मत होतं. माझ्या परीक्षेच्या वेळी नेमकी ही कुठे फिरायला जायची ते मला कळायचंच नाही. मुद्दाम ठेवलेल्या वस्तू मिळायच्या नाहीत तेव्हा ही आठवण काही तरी गडबड असावी असं वाटायचं. कुणी आठवण काढली की उचकी लागते असं म्हणतात; पण आमच्या घरी माझे वडील, काका, आत्या ह्या सगळ्यांची रोज जेवताना पहिल्या घासाला कोण आठवण काढायचं तेवढं मात्र कळायचं नाही. एवढं हे सोडलं तर आठवण फार त्रास द्यायची नाही. 

भूतकाळ फार नव्हता, वर्तमान आनंदी होता आणि भविष्यकाळाची चिंता नव्हती. त्यामुळे आठवणींना थारा नव्हता आयुष्यात. कधी तरी कुठे मामाकडे जाऊन आलं, की दोन-चार दिवस यायची ती आठवण मुक्कामाला; पण तेवढीच, जायची आपल्या वाटेनं. तिचे खोल खंदक झाले नव्हते अजून. मग पुढच्या आयुष्यात पुष्कळ लढाया लढताना मागे वळून बघायला वेळ कुठे होता. वर्तमानात इतकं झपाझप चालायची आणि भविष्यातली तरतूद करण्याचा जो छंद जडला त्यात आठवणी असणारा भूतकाळ लपून बसला जणू. मग काही जवळची जिवाभावाची माणसं चूपचाप न सांगता सवरता निघून गेली, मागं बऱ्याच वर्षांचं भल्या बुऱ्या अनुभवाचं थोडंफार पाठबळ उभं राहिलं, वर्तमानकाळ थोडा स्थिर झाला आणि भविष्यातली क्षितिजापर्यंतची नजर जरा काय, चांगलीच आटोक्यात आली आणि मग आठवणी प्रपातासारख्या यायला लागल्या. जरा मोकळीक दिली की आत घुसायला लागल्या थेट! त्यांना काही धरबंध राहिलाच नाही. ऐकवायला माणसंही सापडायला लागली आणि आजी कशा इतक्या गोष्टी सांगायची त्याचं कोडं हळूहळू उलगडायला लागलं. 

आठवणी कुठल्या मार्गानं येतात ते मात्र अद्याप कोडं आहे. जरा कुठं खुट्ट झालं की येतात. बोट दिलं की लगोलग हात पकडतात. वेगवेगळ्या मार्गानं येतात. माणसं त्यात बुडून जातात हे प्रत्यक्ष पाहिलं आहे. आता हळूहळू मीही त्या वाटेची वाटसरू व्हायला लागले आहे. 

आत्ताच्या काळात बहुतेक समाजमाध्यमांनी याला हातभार लावला आहे. फेसबुकवर, व्हॉट्सअॅपवर, जुनी माणसं भेटायला लागली आणि मग रंगायला लागला ‘तो खेळ!’ ‘तुला आठवतंय? किंवा do you remember?’ आणि त्यातून एक गोड पण आभासी जग उभं राहायला लागलं, पण तेही काही काळच!!

आता मात्र वयानुसार लांबवर मागे वळून बघावं असं वाटतं आहे आणि आठवण ही एक लबाड गोष्ट नसून, देणगी आहे हे कळायला लागलं आणि स्मरणरंजन हा छंदच जडलाय अलीकडे. दहावीत असताना इंग्लिश तन्मयतेने शिकवणाऱ्या गंभीर सरांनी एक वाक्य सांगितलं होतं, की God has given us memory so we might have roses in December... आता त्याचा अन्वय लागतोय... 

वय वाढलं की आपसूक भूतकाळ मुकाट्यानं आपल्या मागे येतो आणि मग आठवणींचा शिवणापाण्याचा खेळ सुरू होतो. आतून कढ येतात. शाळा, कॉलेज, जुने दिवस, आजोळ, माहेरचं घर आणि माणसं ही सगळी आपल्याभोवती फेर धरतात आणि त्या फेरात काही काळ गुंगून जायला होतं खरं! अगदी छान वाटत राहतं. कधी अगदी काही हातातून सुटल्याचं शल्य टोचत राहतं. काही माणसं, काही क्षण हातातून अगदी क्षणात सुटतात; पण आठवणी असतात म्हणून आपण असतो हे मला वारंवार जाणवलंय. 

आठवणींना काळ एकच असतो भूतकाळ, स्वप्नांना भविष्यकाळ आणि जगण्याला वर्तमानकाळ. आठवणींना बहुतेक रंग कृष्णधवल असतो, भविष्याला विविध रंग असतात, तर वर्तमान मिश्रण असतं. सगळ्याच आठवणी अगदी सुखद असतात असं नाही, काही काटा आणतात, काही डोळ्यात खारं पाणी, कधी अंगार. कधी अपमानाचं शल्य, तर कधी कधी तर अगदी काही कारण नसताना जुन्या दिवसातल्या कष्टाच्या आठवणी वर येतात. आपला अहं सुखावतात, त्या दिवसांत कशी वाटचाल केली हे आठवून पाठ थोपटतात. किंवा कोणाचं तरी काही तरी वागणं बोलणं आठवून दुःखही देतात. कधी चुकलेल्या निर्णयांची, कृतींची वावटळ मागे लावतात. 

आठवणी नुसत्या माणसांच्या नसतात कधीच. घराच्या असतात, जागेच्या असतात, प्राण्यांच्या असतात, प्रवासाच्या असतात. दागिन्यांच्या कपड्यांच्या, पुस्तकांच्या असतात. आपली जी पाच ज्ञानेंद्रियं आहेत त्या सगळ्यांना सुखावणाऱ्या आणि कधी दुःख देणाऱ्या म्हणजेच जाणवणाऱ्या असतात. म्हणजे असं, की आई करायची त्या डाळमेथ्यांची आठवण तिला जाऊन इतकी वर्षं झाली तरी जिभेवर आहे, शाळेबाहेर मिळणाऱ्या लाल चिंचेची आणि काळ्या गोळीचीही आहे आणि एकीकडे प्यायला दिलेल्या अत्यंत बेचव सरबताचीही आहे आणि ती जिभेवर आहे. स्वाद स्मरणाची यात्रा तर फार मोठी आहे. 

बागा बीचवरच्या सूर्यास्ताची डोळ्यात आहे दृश्य आठवण. मालिनीताई राजूरकरांची एक मैफिल आठवतेय, हॉलच्या छतावर पडणाऱ्या धुवांधार पावसाच्या आवाजाच्यावर त्यांचा खणखणीत आवाज ऐकल्याची आहे आणि डॉल्बीजवळून जाताना छातीत झालेल्या धस्स धडधडीचीही नाद स्मृती कानात आहे. रातराणीच्या सुगंधाची स्मृती आहे आणि रेग्युलेटर फुटून नाकावर आलेल्या गॅसचीही नाकात पक्की आहे. अगदी कठीण क्षणात खांद्यावर असलेल्या हाताची स्पर्श सय आहे, कौतुक म्हणून पाठीवर फिरलेल्या थरथरत्या हाताची आहेच आहे आणि गर्दीत मुद्दाम सहेतुक झालेल्या ओंगळवाण्या स्पर्शाचीही आहे, शरीरावर आणि मनातही. 

अगदी मोठ्यात मोठ्या, दुर्लक्ष झालेल्या क्षणांच्या आहेत ज्या डोक्यात असतात, पण छोट्यात छोट्या प्रेमाच्या आठवणी मनात असतात. आठवणींनी खूप भिजवलं आहे, मोहून टाकलं आहे आणि जंजाळातही टाकलं आहे. कधी कधी अतिशय सुखद आठवणीबरोबर येणारी बारीक वेदना आहे, तर कुठे आत्यंतिक वेदनेबरोबर आलेली सुखाची सरही आहेच की.   

आठवणींच्या निबिड जंगलात गुंतायचं नाही असं ठरवूनही जमत नाही. कधीकधी आत शिरलं की बाहेरचा मार्ग सापडता सापडत नाही. समुद्राच्या लाटांसारखं त्यांना येऊ देत, स्पर्श करून परतू देत असं वाटतं; पण जमत नाही. कधी तरी मात्र जमतं अगदी स्वतःला निर्लेप ठेवायला आणि कधी पार नाकातोंडात जातं पाणी. 

तशी वेळ-काळ नसते आठवणींना यायला; पण रात्री त्यांना जरा जास्त ऊत येतो, गुलजारजींच्या शब्दांसारखं - 
‘बिगडेल है ये यादें
रातको टहलनेके लिए निकलती है।’ 

रात्रीच्या अंधारात आठवणी जास्त उठून दिसतात. अंधाऱ्या रात्री दिसणाऱ्या तेजाळ चांदण्यासारख्या! असो! नावं तर किती गोड आहेत आठवणींना सय, स्मरण, यादें; पण मला त्यांचं सुमीरण किंवा सुमिरन हे नाव फार गोड वाटतं. वारा आणि वाळू, पारा आणि पाणी ह्यांसारख्या हातात न सापडणाऱ्या पण त्याचं अस्तित्व जाणवणाऱ्या आठवणींना सुमिरन हे नवविधा भक्तीतलं नाव फार गोड वाटतं!

देवळातून बाहेर आल्यावर टेकायचं ते देवाचं रूप आठवायला. त्याचं नाव स्मरण करत रहायचं. मनाचा गाभारा भरून भरून जातो मग. तसंच आठवणीही मन भरून आणि भारून टाकतात आणि मग हळूहळू झिरपत राहतात, वेगवेगळ्या क्षणांत. 



माझ्या जवळच्या नात्यात एकांना विस्मरण झालं आणि आधी थोडं थोडं म्हणताना, ते सगळं विसरले, ते विसरत आहेत हे कळेकळेपर्यंत स्मरण नदीचं पात्र पार करून दुसऱ्या काठावर गेले. काहीसुद्धा आठवण राहिली नाही त्यांना. अत्यंत विद्वान शिस्तबद्ध माणूस, नाती जपणारे; पण माणसंच काय शब्दही विसरले. घरच्यांना तर अगदी बघता बघता विसरले. काय मन चिरत गेली असेल ही सुरी! ते विस्मरण त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिलं, त्यांच्या कुटुंबानी त्यांना अगदी प्रेमानं आणि काळजीकाट्यानं जीव तोडून जपलं. त्यांची आठवण गेली, तरी ह्यांची शिल्लक होती. कधी कधी अशा स्थितीमध्ये आजूबाजूचे विसरतात ते नातं, त्या माणसानं केलेले कष्ट, प्रेम सगळं सगळं! आठवणीत राहतात ते त्यांच्यापासून होणारे त्रास आणि कष्ट! माणूस शारीर आणि मानसिक दुर्बल झाला, की बाकीच्यांच्या आठवणीतून वजा होत राहतो; पण इथं तसं नव्हतं! पूर्ण कुटुंबानी त्यांचं हे विसरलेपण ते जाईपर्यंत निभावलं. ते गेल्यावर त्यांच्या मुलाला मी भेटले, तेव्हा तो म्हणाला, ‘अगं, खरं तर खूप वर्षांपूर्वीच ते गेले होते कारण त्यांची आठवण गेली, त्यानंतर एक शरीर वावरत होतं आमच्यामध्ये.’ 

आठवण गेल्यानं फक्त एक शरीर आणि बाकी काही नाहीच शिल्लक ह्या कल्पनेनं आत्तासुद्धा काटा आला अंगावर. सिनेमांमध्ये ‘याददाश्त खो जाना’ हे सामान्य असतं; पण ते किती खोल वेदनादायक असतं हे कळल्यावर धस्स झालं. त्यांच्या कुटुंबाला त्यांचं हे कणाकणानं विझत जाणं बघणं किती काळीज द्रवून जाणारं झालं असेल. 

त्यामुळे ज्या आठवणींना लबाड समजत होते, त्या आठवणी ह्या अगदी अविभाज्य आहेत, त्या असायलाच हव्यात आयुष्यात हे डोक्यात पक्कं बसलं. मुळात आपण हे आठवणींचं डबोलं आहोत हे अगदी नक्की, पोळं म्हणू हवं तर, पण ती एक आठवणींची साठवण आहे हे नक्कीच. आटोपशीरपणा नाहीच आठवणींना, पसाराच जास्त; पण तरीही विशेष असणाऱ्या.. नको त्या आठवणी असं काही आठवणीबद्दल वाटत असलं, तरी त्या आठवणी बांधून ठेवतात कुठं तरी मुळाशी. 

माझ्याही काही अशा आठवणी आहेत, ज्या माझ्या मनात असलेल्या काही चांगल्या विचारांना आणखी खोल पक्कं करतात. खळकन डोळ्यातून पाणी निघालं, तरी आत कुठे तरी चांगल्या भावना घट्ट धरून ठेवतात. 

मी एके काळी पुष्कळ व्यायाम करत असे, नंतर काही ना काही कारणांनी सुटला; पण जेव्हा जेव्हा सुरू करते, लगेच अनुकूल परिणाम दिसतात. भौतिकोपचार करणारी माझी लेक म्हणाली, ‘आई, muscles have memory’ आणि मी थक्क झाले. म्हणजे फक्त मनाला नाहीत तर शारीर गोष्टींनाही आठवण आहे तर. मग माझ्या इतर अवयवांना असेल का आठवण! मी क्वचित कधी तरी त्यांना काही तरी बोल लावल्याची? किंवा कौतुकाची?

खूप गंमतशीर आहे हे सगळं. नीट तपासून बघायला हवंय हे सगळं! गावाला जाऊन बरेच दिवस झाले, की घरची आठवण येते; पण घरही आपली आठवण काढत असतं असं मला नेहमी जाणवतं. आपल्या नेहमीच्या, सवयीच्या प्रेमाच्या वस्तू आपल्याला आठवत राहतात हे आत कुठे तरी नोंद घेत राहतं मन!

मेरे शहर की बारिश 
तेरी यादों जैसी हुई है
जितना भी बचना चाहूँ
भिगाही देती है

असं अगदी प्रत्यक्ष घडतं आणि आपण भिजत राहतो हेच खरं. आपण गेलेल्या काळाचं, माणसांचं स्मरण करत राहतो. आठवांचा आणि आसवांचा खेळच काही और असतो नाही का! एकमेकांची पाठ सोडत नाहीत; पण तरीही त्या येत राहतात.. सयीवर सयी! आणि सरीवर सरी! कधी तरी मात्र पायात बेड्यांसारख्या पडतात आठवणी, पुढची प्रगती अडवायला लागतात. त्यांना निग्रहानं बाजूला करावं लागतं; पण तशा त्या जात नाहीतच; पण त्यांच्या वाटेनं आणि त्यांच्या वेगानंच जातात.. 

आठवणींच्याबरोबर प्रवास करत भविष्याकडे निघालेलो आहोत आणि आपणही कधी तरी आठवण बनणार आहोत हे त्रिकालाबाधित सत्य आहे; पण आपल्या चांगल्या किंवा फारशा चांगल्या नसलेल्या (का होईना) आपल्या आठवणी, कोणाला तरी कधी तरी येणार आहेत, ही किती छान गोष्ट आहे. ज्यांना आपली आठवण आहे ते पुढे वारसा देताना कुठे तरी आपली ओळख ठेवणार आहेत. 

शारीर अस्तित्व नाहीसं झालेल्या व्यक्ती, वस्तू, प्राणी, वनस्पती, स्थळ, काळ सगळं सगळं जागृत आणि जिवंत ठेवण्याची किमया आठवणींमध्ये आहे. ती जपली पाहिजे. ज्यांनी सुंदर आठवणी दिल्या आहेत, तेच आठवणी बनून राहतात, हा अनुभव नवा नाहीये; पण if someone you love becomes memory, then it becomes a treasure हेही तितकंच खरं. 

नासिरुद्दीन शाहनी १९८८ला पुण्यात एक नाट्य शिबिर घेतलं होतं. त्यात विविध प्रकारचे अभिनयासाठी पूरक असे स्वाध्याय होते. त्यात एका पाठात त्यांनी असं सांगितलं. की तुमच्या आयुष्यातली एखादी अशी गोष्ट सांगा. की ज्यानं तुमच्या डोळ्यात अगदी खळकन पाणी येईल, एका क्षणात. त्या गोष्टीचा अभिनयात काही उपयोग करून घेता येईल का, ह्या विचारासाठी हा स्वाध्याय होता. प्रत्येक जण आपापल्या आठवणी सांगत होतं, बांध फुटत होते, डोळे भरून वाहत होते. मला इतकं वेगळं वाटत होतं, जी माझ्या आजूबाजूला टवाळ म्हणून सुप्रसिद्ध माणसं होती, ती आतून इतकी ओली होती, हे केवळ त्यांच्या मनातल्या त्या आठवणींमुळेच कळलं, जाणवून आत गलबलून आलं. माझ्यावर वेळ आली तर मी काय सांगीन असंही वाटलं. 

माझ्यापर्यंत येईपर्यंत (सुदैवानं) शिबिराची वेळ संपली; पण नंतर विचार केला तर अशा आठवणी सुदैवानं कमीच होत्या तेव्हा; पण एक जुनी आठवण होती अशी, मी साधारण पाच वर्षांची होते आणि माझे आजोबा त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात होते. अर्धवट गुंगीत माझं नाव घ्यायला लागले म्हणून लहान असून बापूंनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि शुद्ध-बेशुद्धीच्या सीमारेषेवर माझ्या हाताच्या बालस्पर्शानं त्यांना मी आठवले. ते नंतर आठवणी इथेच सोडून पुढच्या प्रवासाला गेले आणि मला अगदी पहिली अंधूक का होईना आठवण देऊन गेले. No longer by my side but always in my heart आणि दुसरी म्हणजे माझ्या धाकट्याच्या जन्मानंतर आई संधिवातामुळे येऊ शकत नव्हती; पण बापू माझ्या लेकीला, तिला तिच्या छोट्या भावाला भेटवायला घेऊन आले, पाळण्यात वाकून ते त्यांचं नातवंड इतक्या प्रेमानं बघत होते आणि नंतर ते काही तरी म्हणायला लागले, मी विचारल्यावर म्हणाले, तुझ्या आईनं सांगितलं आहे की रामरक्षा म्हणा, ते दोघेही सुखरूप राहोत म्हणून. माझ्या लेकीचं बोट धरून, त्यांच्या लेकीकडे आणि माझ्या लेकाकडे मायेनं बघणारे, डोळ्यात पाणी पण आनंदानं निथळणारे बापू, ती आठवण मला आजही ह्या क्षणीही भिजवून जातेय.. ते त्या क्षणांचं स्मरण चिरंतन देऊन गेले. आजोबांच्या प्रवासाचा शेवट, माझ्या मुलाचा जन्म आणि त्यामध्ये आई-बापूंकडून मिळालेल्या जीवनातल्या एका अमाप, असीम आणि निरपेक्ष प्रेमाची ही आठवण परमेश्वरानं शेवटपर्यंत कायम ठेवावी इतकी स्मरणशक्ती शाबूत ठेवावी हीच प्रार्थना! 

Memories may fade as the years go by but they won’t age a day.Michelle C. Ustaszeski 

- मृण्मयी सहस्रबुद्धे

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IVJMCT
Similar Posts
बालपणीच्या आनंदाच्या अनुभवाचं पान एक मोठ्ठं सुख आम्हाला लहानपणी आमच्या गावात, आश्वीला अनुभवायला मिळालं आणि पुढे ते सुख आमच्यासोबत कोकणात आमचं बोट धरून दाखल झालं. आश्वीच्या ‘रानमळ्या’तल्या घराच्या अंगणातली ती टपोऱ्या जांभळाची झाडं, विहिरीशेजारची थंडगार पंचवटी, कडूसाल्या, शेंदऱ्या ही नावं आठवतायत. आजही ती चवही किंचितशी आठवते. मी सात-आठ
आठवणींची तंद्री आणि वर्तमानाचं चक्र रात्रीत कधीतरी हात पांघरुणाबाहेर आलेला असतो. पहाटे या कुशीवरून त्या कुशीवर वळताना तो थंड पडलेला हात अलगद परत उबदार पांघरुणात जाऊन पांघरूण पार कानापर्यंत घेऊन परत झोपायचं. जरा डोळा लागणार तोच वैद्य अंधारात करत असलेल्या चहाचा दरवळ माझ्या नाकापर्यंत येतो. ‘चहा तयार होतोय’ची सूचना मेंदूनं दिलेली असल्यानं
... तर मी ‘डिसेंबर’ झाले असते! मला कायम वाटतं, की मला कोणी एखादा महिना होण्याची संधी दिली असती, तर मी डिसेंबर झाले असते... मस्त गुलाबी थंडीचा, धुक्याच्या दुलईचा... शाळेतल्या स्नेहसंमेलनांचा, प्रेमाला बहर यायला अगदी आदर्श असलेला... सांताक्लॉजच्या ख्रिसमसचा, लग्न समारंभांचा, फिरण्याचा... भटकण्याचा... नाटक, गाणी, नृत्याच्या कार्यक्रमांची
आठवणीतला हंडा आणि स्मरणरम्य आंघोळ दरवेळेला गेल्यानंतर गावात, घरात झालेले कोणते-ना-कोणते तरी बदल पाहायला मिळतात, लगेच लक्षातही येतात. गावात कुठेतरी नव्या बिल्डिंग उभारलेल्या दिसतात, काही जुनी घरं गायबच झालेली असतात, रस्तारुंदीकरणासारख्या भानगडीत काही जुन्या झाडांनी राम म्हटलेला असतो...सध्याच्या भाषेत सांगायचं तर गावाचा होत असलेला ‘विकास’ अगदी नजरेत भरतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language